बन्या मोठा झालाय

इंग्रजी साहित्यात धाडसी आणि रहस्यमयी कथांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगाथा ख्रिस्तीचा 'पायरो'. सर आर्थर कॉनन डॉयल चा 'शेरलॉक', अनेकांच्या लेखणीतून साकार झालेला 'बॉंड' ह्यांसारख्या अनेक गुप्तहेरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे . त्याचप्रमाणे 'फेमस फाईव्ह', 'हॅरी पॉटर' बालसाहित्यातील धाडसाची धुरा सांभाळत आहे. ह्याच धर्तीवर भारतीय साहित्यात गाजलेला एकमेव गुप्तहेर म्हणजे बंगाली भाषिक 'ब्योमकेश बक्षी'. मराठी साहित्यात असा कोणता गुप्तहेर झाला नाही मात्र बालगुप्तहेर नक्की झाला तो म्हणजे 'बनेश फेणे' उर्फ 'फास्टर फेणे' ! ट्टाॅक!

भास्कर रामचंद्र भागवत यांचा मानसपुत्र म्हणजे आपला 'बन्या'. बन्याची रुपेरी पडद्यावरची ही पहिलीच वेळ मात्र ८०च्या दशकात सुमीत राघवनने त्याला दूरदर्शनवर साकारला होता. एखाद्या प्रसिद्ध गुप्तहेरावर चित्रपट करताना सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे त्याची वृत्ती सांभाळणं; दिग्दर्शकाने अगदी तेच केलय. चौकड्यांचा शर्ट, सायकल आणि सायकल होऊन चपळ अशी बन्याची बुद्धी सतत दिसत राहते. भागवतांनी फास्टर फेणेचा काळ हा चीनच्या युद्धाच्या आसपासचा साकारला आहे हे 'फास्टर फेणेचा रणरंग' तसेच 'जवानमर्द फास्टर फेणे' ह्या पुस्तकांमधून दिसून येते. मात्र आदित्य सरपोतदारने त्याला आजच्या काळात आणून ठेवले आहे, ही संकल्पना २०१० साली प्रदर्शित झालेल्या 'शेरलॉक' नावाच्या मालिकेवरून प्रेरित असू शकते. चित्रपटाची सुरुवात भन्नाट वेगाने जाणाऱ्या २ दुचाकींच्या अपघाताने होते आणि जणू काही त्या २ गाड्यांचा वेग चित्रपट पकडतो. कित्येक वेळ तो अपघात संदर्भहीन वाटतो पण त्याचा संदर्भ लागता लागता चित्रपट उलगडत जातो. भा. रा. भागवतांचे निधन २००१ सालीच झालंय पण दिलीप प्रभावळकरांकडे पाहताना ते अजूनही जिवंत आहेत अस वाटत राहत.कथेतील २ महत्त्वाची पात्र 'फेणे आणि आप्पा' ही अनुक्रमे 'अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णी' ह्यांनी अतिशय चपखल साकारली आहेत. केवळ मुख्य पात्र नव्हे तर इतर प्रत्येक पात्र आपल्याला तितकच लक्षात राहतं, मग ती अबोली(पर्ण पेठे) असो, अंबादास(सिद्धार्थ जाधव), भूभू(शुभम मोरे), धनेश(ओम भूतकर) असो  वा पारकर(योगेश सोमण). सुरुवातीला छोटीशी वाटणारी चोरी ही एका खूप मोठ्या शिक्षण घोटाळ्यावर प्रकाश टाकते आणि मग संपूर्ण कथा त्या भोवती फिरत राहते. अख्ख्या चित्रपटात कुठलीच गोष्ट अर्धवट राहत नाही. अबोली आणि बन्याच मैत्रीचं नातं दिग्दर्शकाने सुरेख उभं केलय. चित्रपटात बन्या कित्येक वेळेस तंत्रज्ञानाची मदत घेऊन रहस्याचा मागोवा काढताना दिसतो तेव्हा १-२ वेळचा अपवाद वगळता प्रत्येक वेळेस ते योग्य आणि वाजवी वाटते. एक मुरलेला गुंड आणि एक १६-१७ वर्षाचा चुणचुणीत, चपळ मुलगा ह्यांच्यामध्ये रंगलेला सामना कुठेही कंटाळवाणा होत नाही, ह्याला जितक्या जबाबदार कथानक, अभिनय ह्या गोष्टी आहेत तितकीच जबाबदार गोष्ट म्हणजे पार्श्ववसंगीत. पडद्यावर दिसणारी आणि ऐकू येणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवते.

'अग्निपथ' ह्या चित्रपटात अमिताभ डॅनीला म्हणतो की 'सवाल जिस जबान में किया जाय... जवाब उस ही जबान में देना चाहिये' ह्या न्यायाने बन्या आप्पाला प्रतिसाद देताना दाखवलाय ते बघायला मजा येते. भूभू च्या साथीदारांचा, अंबादासचा बन्याने धूर्तपणे केलेला उपयोग पाहताना भन्नाट वाटत. चित्रपटाचा शेवट हा जरी अपेक्षेप्रमाणे असला तरी आपल्या अपेक्षापूर्तीचा मार्ग अतिशय भन्नाट आणि रोमांचकारी आहे हे नक्की !!  
एक मात्र नक्की की 'लई भारी' पासून रितेश देशमुखने मराठी चित्रपट सृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलय! जर कधी भागवतांनी त्यांच्या पुस्तकांमधून बन्याला मोठा केला असता तर ह्या चित्रपटाची पटकथा हेच  त्यांचं पुढचं पुस्तक झालं असतं...!!!  
ट्टाॅक ...!!!