हरवलेल्या देशभक्तास,
मी आज सत्तरीत प्रवेश केला. आई-वडील वयस्कर झाले की मालिका, चित्रपटांमधून आणि आजकाल घराघरांतून त्यांची जी दुर्दशा होते माझीदेखील तशीच होत चालली आहे म्हणून जरा तुमच्याशी बोलायचंय. १८५७ ते १९४७ ह्या कालखंडात माझ्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लक्ष लक्ष अपत्यांनी आपल सर्वस्व वाहिलं तेव्हा कुठे माझा जन्म झाला ! ४७ नंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि बऱ्याच बिघडल्या. आपण ज्यावर नितांत प्रेम करतो असा अंगणातील बहरलेला वृक्ष अचानक पालिकेच्या रस्त्यात अथवा समोरच्याच्या हद्दीत जावा अगदी तशीच माझी 'सिंधू' गेली ...! आता आमच्यात भिंत नाही तर काटेरी कुंपण आहे ... असो !
चांगले सून-जावई लाभले की लग्नानंतर ते जशी आपल्या नवीन घराची भरभराट करतात अगदी तशीच भरभराट इंग्रजांमार्फत आलेल्या विज्ञान-तंत्रज्ञानाने , शासन प्रणालीने , शिक्षणाने माझी केली. उलटपक्षी घरातले घरभेदी जसे वाळवीसारखे घराला पोखरतात तसेच आपल्याच जाती-वर्ण-धर्म-लिंग इ. भेदांनी मला आतून पोखरलंय. पण तरीही संस्कृती, योग, संस्कृत व इतर भाषा, विविध धर्मांची मूलभूत आणि शाश्वत अशी योग्य आचरणे, इतिहास, तत्वज्ञान अशा कित्येक मूळांनी मला घट्ट धरून ठेवलंय म्हणूनच मी आजवर टिकून आहे.
माझी काही गाऱ्हाणी आहेत , तेवढी ऐक मग तू ठरव काय हव ते. परकीय शिक्षण घेणं काहीच चुकीचं नाही पण ते घायला गेल्यावर स्वतःच परकीय होणं किती योग्य ! कबूल आहे इथल्याच कित्येक गोष्टी तू घर सोडायला कारणीभूत ठरतात पण मग परत येऊन ते बदलायचं मनावर घे, शिक्षिताने जर शिक्षणाचा वसा घेतला तर चित्र पालटायला वेळ लागणार नाही; एरवी तर येरागबाळ्याच्या नावानेही शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे आहेत पण शिक्षण आणि दर्जा ह्यांचा पत्ता नाही . एकेकाळी स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी तसेच स्वातंत्र्यसंग्रामात आपलाही हातभार असावा म्हणून प्रत्येक समाज जातीने पुढे येत होता तर आता आपली ताकद , शक्ती दाखवण्यासाठी जातीने मागास होत आहे ! कितपत योग्य आहे हे सगळ ! विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मंगळ गाठला खरा पण अंगणातील, परिसरातील वृक्षतोड होत असताना काहीच कस अमंगल वाटत नाही. सरसकट कर्जमाफी, फुकट वीज, फुकट पाणी, फुकट शिक्षण... ह्या फुकटेपणाची इतकी सवय लागली आहे की त्यासाठी स्वाभिमानाचा बळी गेला तरी चालतो. न्यायव्यवस्थेचा तर इतका खेळखंडोबा झालाय की तुम्हालोकांना एखादा कायदा समजण्याआधी त्यातल्या पळवाटा समाजतात.
हे झाल सामाजिक ... वैयक्तिक तर विचारायला नकोच! २००₹ दंड वाचवण्यासाठी ५०₹ दक्षिणा देता तुम्ही पण नियम का नाही पाळत. इतर देशांत जाऊन आल्यावर त्यांच्या स्वच्छतेची तारीफ करताना आपल्या रस्त्यात कचरा टाकता, थुंकता तेव्हा माझी काळजी का नसते .स्वभाषेची कुचंबणा झाली तरी बेहत्तर पण इंग्रजी ही फाडता यायलाच हवी असं का . माझ्याबद्दल जरा कुठे चांगलं बोलायचं असेल की म्हणायचं 'हे काय भारी आहे ना एक्दम फॉरेन सारख' असं का ! शिक्षण म्हटल की फक्त अभियांत्रिकी, वैद्यकीय नाहीतर 'सीए'... बाकी क्षेत्रांमध्ये काय ठेवलंय असं म्हणत हिणवायच. एकेकाळी फासावर लटकताना कित्येकांनी शेवटी 'वंदे मातरम्' ह्या मंत्राचा जप केला आणि आज 'वंदे मातरम्' म्हणायला सांगितल्यावर कोणाचा धर्म मध्ये येतो तर कोणाचा मूलभूत हक्क.
हे सार किती योग्य आहे आणि किती अयोग्य हे तूच ठरव ! पण मला महासत्ता करायच असेल तर ह्या आणि अशा अनेक मुद्द्यांवर तोडगा काढायला हवा... काढू शकणारेस का ! झेंडा फडकावणं तसं सोप्प आहे पण खाली पडलेला तिरंगा उचलू शकशील का ! कर विचार !
ता.क. एकच सांगतो राष्ट्रभक्ती ही 'आसक्ती'ने होते 'सक्ती'ने नाही ...! उत्तिष्ठ !
तूझाच आणि तुझ्याकडून अपेक्षा बाळगणारा
प्रिय हिंदुस्तान !