मिसळींच मल्टिप्लेक्स ...!

महाराष्ट्राच्या खाद्यपरंपरेत 'मिसळ' ह्या खाद्य पदार्थाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोल्हापूर मधील फडतरे, खासबाग; पुण्यातील वैद्य, बेडेकर, बापट, काटाकीर; नाशिकची चुलीवरची मिसळ; ठाण्यातील मामलेदार, गोखले; मुंबईतील आस्वाद, आराम, प्रकाश आणि इतर बऱ्याच ठिकाणच्या मिसळ परंपरेचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. जसे 'सिंगल स्क्रीन' चित्रपटगृहांमधे एकाच चित्रपटाचे खेळ चालतात तसेच काहीस ह्या सर्व मिसळींच , चविष्ट असली तरी एकच चव ! आता जमाना 'मल्टिप्लेक्स'चा झालाय तेव्हा जर तुम्हाला एकाच छताखाली मिसळीच्या भिन्न चवी अनुभवता आल्या तर ...! ही कल्पना आपल्यासमोर प्रत्यक्षात आली आहे ठाण्यातील 'सुरुची मिसळ हाऊस'च्या रूपाने !

अजित मोघे ह्या खवय्याच्या डोक्यातून साकारलेलं 'सुरुची मिसळ हाऊस' प्रत्येक खवय्यासाठी एक पर्वणी आहे. 'सुरुची' मध्ये आंबट-गोड चवीची पुणेरी मिसळ, झणझणीत कोल्हापूरी मिसळ, उपासाची मिसळ आणि त्यांची स्वतःची सुरुची स्पेशल अशा मिसळींची रेलचेल आहेत. ह्यांच्या जोडीला अप्रतिम वडा उसळ आणि पोटाची आग शमवायला खरवस, ताक असे अजून पुष्कळ पदार्थ आहेत. 'सुरुची मिसळ हाऊस' मध्ये शिरताच खमंग 'तरी'चा सुगंध येतो. वेगळ्या धाटणीच्या तसेच आकर्षक बांधकाम आणि सजावटीमुळे 'सुरुची'ला एक वेगळे स्वरूप मिळाले आहे ज्याने मिसळ खाण्याचा आनंद द्विगुणित होतो.

पत्ता - सरस्वती निवास, रिलायन्स फ्रेश आणि मल्हार सिनेमा समोर, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.), ४००६०२. 

तेव्हा नक्की आस्वाद घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ...! 

लोभ असावा ही विनंती ...!